मुंबईत लोकलच्या धडकेत गँगस्टरच्या मुलाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2017 08:35 AM (IST)
32 वर्षीय गीतेश चोपडेचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी शिवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सापडला होता.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबईतील शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या मुलाच्या मृतदेहाचा उलगडा झालेला आहे. मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळ ओलांडताना लोकलने धडक दिल्याचं जीआरपींनी सांगितलं. 32 वर्षीय गीतेश चोपडेचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी शिवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सापडला होता. गीतेश हा गोल्डन गँगचा म्होरक्या चंद्रकांत खोपडेचा मुलगा होता. लोअर परेलमधील सन मिल कम्पाऊंडमध्ये गँगस्टर चंद्रकांतचा अड्डा असल्याचं म्हटलं जातं. हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार सारख्या बड्या गँगस्टर्ससाठी तो काम करायचा. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गीतेशचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला, असं जीआरपी ऑफिसरनी सांगितलं. त्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ही आत्महत्या आहे, अपघात की घातपात, याबाबतही पोलिस तपास करत होते. अखेर, मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळ ओलांडताना गीतेशला लोकलने धडक दिल्याचं तपासात समोर आलं. गीतेशसोबत दारु पित बसलेल्या मित्राने ही माहिती दिली. आणखी दारु आणण्यासाठी गेलेला गीतेश परत आला नव्हता.