गणपतीचा मुखवटा घालून मिरवणूक, प्रसादात झंडूबाम, मनसेचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 08:47 AM (IST)
डोंबिवली : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे, मात्र डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न काही केल्या संपताना दिसत नाही. त्यामुळेच मनसेने अनोख्या पद्धतीने झंडूबाम आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. डोंबिवलीत गेल्या महिन्याभरापासून रस्त्यांवर खड्ड्यांनी ठाण मांडलं आहे. त्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याचा निषेध म्हणून मनसेने झंडुबाम आंदोलन केलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातल्या खड्ड्यांमधून कार्यकर्त्याला गणपतीचा मुखवटा घालून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत प्रसाद म्हणून झंडूबामचं वाटप करण्यात आलं. महापालिका कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक गणेश आरती करुन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची सुबुद्धी महापालिकेला द्यावी अशी प्रार्थना यावेळी मनसेतर्फे करण्यात आली. त्यानंतर कार्यकारी अभियंते सुभाष पाटील यांना घेराव घालून मनसेने त्यांना जाब विचारला. 10 दिवसांत खड्डे न बुजबल्यास मनसे स्टाईल खळ्ळ खटॅक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.