मुंबई : मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अवघ्या दहा रुपयांसाठी एका रिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाखाली मारली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला पकडून चोप दिला.


संबंधित युवकाने बीकेसीला जाण्यासाठी कुर्ल्याहून शेअर रिक्षा पकडली. कुर्ला-बीकेसी रिक्षा प्रवासाचं भाडं प्रतिप्रवासी 20 रुपये आहे. रिक्षा बीकेसीत पोहचल्यावर रिक्षाचालकाने प्रवाशांकडे 30 रुपये मागितले. एका युवकाने जास्तीचे 10 रुपये देण्यास नकार दिला आणि या रिक्षाचालकाचा मुजोर स्वभाव जागा झाला

प्रवाशाला दमदाटी, धक्काबुक्की करण्यास रिक्षाचालकाने सुरुवात केली. वाद नको म्हणून या प्रवाशाने जास्तीचे 10 रुपये दिले. मात्र पैसे मिळल्यावरही गपगुमान निघून जाण्याचं नाव तो रिक्षाचालक काढेना. त्याने पुन्हा या प्रवाशाच्या कानशिलात लगावली.

हा सगळा प्रकार दुसऱ्या प्रवाशाने आपल्यात मोबाईलमध्ये कैद केला. रिक्षाचालकाच्या मुजोरपणाचा हा व्हिडिओ एव्हाना व्हायरल झाला होता.

मराठी माणसावरचा हा हल्ला मनसेच्या जिव्हारी लागला. मनसैनिकांनी या रिक्षाचालकाला शोधलं आणि आपला हिसका दाखवला. चोप देत त्याला उठाबशा काढायला लावल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा मनसैनिकांनी या रिक्षाचालकाला गाठलं. माफी मागायला लावली आणि पुन्हा चोप दिला.

या घटनेनंतर अखेर परिवहन विभागालाही जाग आली आहे. या रिक्षाचालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला.

भाडे नाकारणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणे. पुढच्या सीटवरही प्रवाशाला बसवणे, मारहाण करणे हे प्रकार आता सर्रास होत आहेत. परिवहन विभागाने कडक पावलं उचलली, तरच रिक्षाचालकांच्या या मुजोरपणाला आळा बसू शकतो.