मुंबई : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या 18 मार्चला शिवतीर्थावर जाहीर सभा घेणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीज घालवली तर त्यांना तुडवा, असं चिथावणीखोर वक्तव्य करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 12वा वर्धापन दिन आज वांद्रेतील रंगशारदा सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

'18  तारखेला मी शिवतीर्थावर सभा घेणार आहे. पण त्याआधी तुम्ही घरी सांगून ठेवा की, बाजारातून मेणबत्या घेऊन या. कारण माझी सभा सुरु झाली की दिवे घालवण्याचे धंदे केले जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील माझ्या मनसैनिकांना सांगणं आहे की, हे जे कोणी दिवे घालवणारे अधिकारी असतात त्यांच्याशी आधी बोलून ठेवा. जर सभा सुरु असताना असल्या काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. इतर राजकीय पक्षांच्या दबावाला बळी पडून आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला असं काही करणार असतील तर त्यांना आपला हिसका दाखवणं गरजेचं आहे.' असं चिथावणीखोर वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ‘भाजपवाल्यांसारखी खोटी नोंदणी करायची नाही.’ असं म्हणत त्यांनी भाजपवर तोंडसुख घेण्याची संधीही सोडली नाही. त्यामुळे  येत्या 18 मार्चला राज ठाकरे शिवाजी पार्कवर काय बोलणार याची आता उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, 12 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी 9 मार्चला शिवतीर्थावर सभा घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली होती.

त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 13 आमदार निवडून आणत कमाल करुन दाखवली. शिवाय नाशिक पालिकेत एकहाती सत्ता आणली. तर पुणे, मुंबई, खेडसह अनेक पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नगरसेवकही निवडून आले.

मात्र त्यानंतर राज यांचा करिश्मा कायम राहिला तरी पक्षाला त्याचा फायदा झाला नाही, कारण 2014 ला आमदारांची संख्या 13 वरुन 1 वर आली. नाशिकमधली सत्ता गेली. बरेच नेते सोडून गेले. त्यामुळे आता पक्षात प्राण फुंकण्याचं नवं आव्हान एका तपानंतरही कायम आहे.

संबंधित बातम्या :

मनसेचा 12 वा वर्धापन दिन, आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा