MNS : मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता. आता मनसेकडून याबाबतची आपील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदार केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाब पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे, असे नांदगांवकर म्हणाले. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
बाळा नांदगांकरांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलेय?
एक सप्टेंबर 2022 रोजी कामाठीपरा या परिसरात घडलेली घटना पाहून मन: विषन्न झाले. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदार केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाब पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे.
पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात येत आहे.
भविष्यात या प्रकरणाची प्रतयक्ष माहिती घेऊन व सखोल चौकशी करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महिलांचा व जेष्ठांचा आदर सन्मान हा राखला गेलाच पाहिजे...
धन्यवाद!
जयहिंद! जय महाराष्ट्र!!
आपला नम्र,
बाळा नांदगांवकर
नेमकी घटना काय घडली?
३० ऑगस्ट रोजी मुंबईतल्या मुंबादेवीमध्ये हा सगळा प्रकार घडला. ज्या महिलेला मारहाण झाली... त्या महिलेचं नाव आहे प्रकाश देवी... या परिसरात त्यांचं मेडिकलचं दुकान आहे.... याच दुकानासमोर जाहिरातीचे फलक लावण्याचं काम सुरु होतं... हे काम मनसेचा पदाधिकारी विनोद अरगिलेच्या देखरेखीखाली सुरु होतं... पण हे जाहिरातीचे फलक लागले असते... तर या महिलेचं दुकान या फलकांच्या मागे लपलं गेलं असतं... म्हणून तिनं या फलकांना विरोध केला. इथेच अरगिलेचा पारा चढला. आणि त्यानं शिविगाळ सुरु केली. प्रकरण इतकं वाढलं...की अरगिलेनं प्रकाश देवी यांना थोबाडीत मारली. इतकंच नाही... तर ढकलूनही दिलं. शरमेची गोष्ट ही.की इतकं काही घडत असताना. एकही माणूस या महिलेच्या मदतीला धावला नाही.