मुंबई : दोन्ही ठाकरेंनी मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावं अशी साद खासदार संजय राऊत यांनी घातल्यानंतर मनसेच्या वतीने त्याला उत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी या आधी राज ठाकरेंना 2014 आणि 2017 साली धोका दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले. आता आम्हाला नैतिकता शिकवणाऱ्यांकडेच नैतिकता शिल्लक राहिली आहे का हे पाहावे लागेल असाही टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

मराठी माणसासाठी आपण सगळी भांडणं विसरायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं म्हणाले. त्यावर आता मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली  आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, आता ते म्हणतात त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थीती आहे का हे पाहावं लागेल. आमची जीभ आधीच पोळली आहे. त्यामुळे आता कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडला आहे. बाकी युतीचा निर्णय हा राज ठाकरे हेच घेतील असं संदीप देशपांडे म्हणाले.

MNS Reply To Shiv Sena Uddhav Thackeray : 2017 साली आम्हाला धोका दिला

संदीप देशपांडे म्हणाले की, "2017 साली श्रीधर पाटणकर हे मला भेटले आणि दोन्ही ठाकरेंना एकत्र यावे असं सांगितलं. त्यांच्या प्रस्तावावर मी राज ठाकरेंशी बोललो आणि नंतर पाटणकरांना निरोप देण्यात आला. आमच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायले गेले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की आता त्यांचे भाजपसोबत लग्न तुटणार आहे आणि नंतर आपला साखरपुडा करू. नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडली. पण नंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलायचे बंद केले."

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, "2014 सालीही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एकत्र लढूयात असं सांगितलं. आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि त्यांच्याकडून अनिल देसाई चर्चा करायचं ठरलं. त्यावर राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले. पण त्यानंतर अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे यांनी फोन उचलायचे बंद केले."

2014 आणि 2019 असे दोन वेळा आम्हाला धोका दिला. आता जे महाराष्ट्राचे शत्रू असं तुम्हाला वाटतंय त्यावेळी ते शत्रू नव्हते का? असा प्रश्न संदीप देशपांडे म्हणाले. सत्तेचा वाटा मिळत होता त्यावेळी भाजप यांच्यासाठी चांगला होता. पण 2019 नंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरेंचे फिस्कटले आणि त्यानंतर भाजप त्यांना महाराष्ट्राचा शत्रू वाटायला लागले. त्या आधी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढले. नंतर महाविकास आघाडी स्थापन करुन  मुख्यमंत्री झाले असं संदीप देशपांडे म्हणाले. 

आता ते शरद पवार आणि काँग्रेसला धोका देणार

जर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले असते तर भाजप त्यांच्यासाठी शत्रू असता का याचे उत्तर त्यांनी द्यावेत असंही संदीप देशपांडे म्हणाले. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला, त्यांनी भाजपला धोका दिला. आता ते शरद पवार आणि काँग्रेसला धोका द्यायला तयार आहेत. अशा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न आम्हाला पडतोय असं संदीप देशपांडे म्हणाले.