भिवंडी : रस्त्यावर खड्डे असताना टोल वसुली केली जात असल्याच्या विरोधात मनसेनं भिवंडीत आंदोलन केलं आहे. भिवंडीत एक सप्टेंबर रोजी रस्ते दुरुस्तीसाठी टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी श्राद्ध आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात मुंडनही केले होते. शिवाय याच दिवशी गणेशउत्सवापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा टोल वसुली बंद करण्याची  होती मागणी केली होती. मात्र गणेश विसर्जन होऊनही रस्ते जैसे थे असल्याने अखेर भिवंडी - ठाणे मार्गावरील कशेळी टोल नाका  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी खळ्ळखट्याक स्टाईलने फोडला आहे. 


ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही 20 ऑगष्ट रोजी भिवंडी तालुक्यातील वसई मार्गावरील खारबाव कामण रस्त्यावरील मालोडी टोल नाक्याची तोडफोड मनसे कार्यकर्त्यानी केली होती. त्यांनतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही खड्डे जैसे थे असल्याने 1 सप्टेंबर रोजी  टोल कशेळी नाक्यावरच  मनसेने  प्रशासनाचं श्राद्ध घालत अधिकाऱ्यांविरोधात  मुंडन आंदोलन करून  टोल बंद केला होता. 


भिवंडी मार्ग  बीओटी तत्वावर तयार करण्यात येऊन या मार्गवरील कशेळी गावाच्या हद्दीत टोल नाका उभारून याठिकाणी वसुली सुरु केली. मात्र रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे.  अंजुर फाटा ते कशेळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागतो आहे. 


अनेकांना मानेचा ,कमरेचा ,पाठीच्या आजाराला देखील समोरे जावे लागत आहे. तसेच अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे . या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोल वसुली का केली जाते असा सवाल मनसेच्या वतीने करण्यात आला.  त्यामुळे कशेळी टोल नाका ते अंजुर फाटा रस्ता गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी  तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु  टोल वसुली सुरू असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी कशेळी टोल नाका मनसे स्टाइलने फोडला आहे. तर नाशिक-मुंबई महामार्गावर देखील प्रचंड खड्डे असल्याने पडघा टोल नाक्याला देखील इशारा देण्यात आला आहे.