खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसे गप्प बसणं शक्यच नाही : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2018 07:51 PM (IST)
गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो, असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान व्यक्त करत, त्यांचं अभिनंदनही केले.
मुंबई : खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसे गप्प बसणे शक्यच नाही, गेले काही दिवस आमच्या पक्षातर्फे राज्यभर आंदोलनं सुरु आहेत, व्यवस्थेला जागं करणं सुरु आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. आंदोलन करणाऱ्यांचा आपल्याला अभिमान आहे, असे राज ठाकरे म्हणाले. खड्ड्यांसंदर्भात राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. “राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे ते थेट चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका, ह्यांच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभारामुळे 'रस्त्यात खड्डे' म्हणायच्या ऐवजी 'खड्ड्यात रस्ता' म्हणावं लागेल अशी सर्वत्र परिस्थिती आहे.”, असे म्हणत राज ठाकरेंनी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनांवर निशाणा साधला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात केलेल्या विविध अनोख्या आंदोलनांचं कौतुकही राज ठाकरेंनी केले. ते म्हणाले, “राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलनं सुरु आहेत. ही आंदोलनं लोकांसाठी आहेत. असंवेदनशील सरकारी व्यवस्थेला जागं करण्यासाठी सुरु आहेत. मग ते खड्डयांनी भरलेल्या शीव-पनवेल रस्त्यावर केलेलं आंदोलन, कल्याण-डोंबिवली महापालिकेवर नेलेला मोर्चा असेल, पुण्यातील प्रशासकीय कार्यालयात तिरडी ठेवून निषेध केलेलं आंदोलन, चंद्रपूरमध्ये खड्ड्यात मत्स्यपालन करून केलेलं निषेध आंदोलन, पालघरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन, बांधकाम विभागाच्या कार्यालयात जावून रक्तदान करणं, मंत्रालयासमोरील प्रतीकात्मक आंदोलन, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेलं यशस्वी आंदोलन, मुंबईत टोलबंद आंदोलनाची हाक, ठाणे शहरातील निदर्शनं असतील. हेतू एकच ह्या व्यवस्थेला स्वतःची लाज वाटावी आणि परिस्थती सुधारावी.” तसेच, गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो, असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान व्यक्त करत, त्यांचं अभिनंदनही केले. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट :