मुंबई : राज्यात मराठी (Marathi) विरुद्ध परप्रांतीय किंवा मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा विषय तापला असताना मुंबईत मराठी विरुद्ध मराठी अशीच घटना घडली असून एका मराठी महिलेसोबत मनसेच्या नेत्याच्या मुलाने हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे (MNS) प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलाने रस्त्यावर दारु पिऊन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा केल्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. विशेष म्हणजे राहिल शेखने मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देत तिच्याशी हुज्जत घातली. तसेच, मॉडेल राजश्री मोरेला शिवीगाळ करत पैशाचा आणि आपले वडिल मनसेचे नेते असल्याचा माजही दाखवला होता. मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिम परिसरात मध्य रात्री 1 वाजता ही घटना घडली असून सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर, मनसेच्यावतीने पत्रक काढून संबंधित मुलाचा मनसे पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.  

Continues below advertisement

मनसे नेत्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत दारूचे नशेत महिले सोबत धिंगाणा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राहिल शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद यांने दारुच्या नशेत राजश्रीसह पोलिसांना देखील दम दिला होता. त्यानंतर, पोलिसांनी त्याला आंबोली पोलीस स्टेशनमध्ये नेले असता, पोलीस ठाण्यातही त्याने रात्रभर धिंगाणा केल्याची माहिती समोर आलीआहे. 

तो मुलगा उद्धटपणे बोलत होता, सातत्याने माझा बाप कोण आहे हे तुला माहिती नाही. तू ठाण्यात जा, माझा बाप मनसेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. तू राज ठाकरेंच्या घरी जा, तुझ्या गाडीचा खर्च तिथून घे.. असे तो दारुच्या नशेतील मुलगा माझ्याशी बोलत होता. मी तुला विकत घेऊ शकतो, तुझ्याकडे नसेल तेवढा पैसा मी तुला देऊ शकतो, असे म्हणत तो आरोपी घाण-घाण शिवीगाळ करत होता, असेही राजश्री मोरेने म्हटले. दरम्यान, राजश्री मोरे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनात व्हिडिओ ट्विट केल्यामुळे मनसेकडून राजश्री मोरेला धमकी देण्यात आल्याचा आरोपही तिने केला होता. तसेच, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जाणीपूर्वक त्रास दिला जात असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय देखील तिने व्यक्त केला आहे. 

Continues below advertisement

राहिल शेखवर योग्य ती कारवाई करा - मनसे

जावेद शेख हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या मुलाने जे कृत्य केले आहे, त्याच्याशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. त्या कृत्याचे समर्थन आमचा पक्ष करत नाही. संबंधित पोलीस यंत्रणांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती, असे परिपत्रक मनसेच्यावतीने मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काढले आहे. त्यामुळे, याप्रकरणी मनसेकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली असून संबंधित राहिल शेखवर कारवाई करण्याचे स्पष्टपणे सूचवले आहे.