मुंबई : काँग्रेसकडून 'नफरत से नही प्यार से जितेंगे' असा संदेश देणारे पोस्टर्स आपल्याला मुंबईच्या विविध भागात पाहायला मिळत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज मुंबईच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पदाधिकारीच्या बैठक आणि भेटी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे पोस्टर्स जागोजागी लावले आहेत.


राहुल गांधी यांच्या अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या भाषणाचा आधार घेत मुंबई काँग्रेसने 'नफरत से नही प्यार से जितेंगे' या टॅगलाईनसह अमित शाह यांच्या दौऱ्याचं निमित्त साधत मुंबईत पोस्टर्स लावले आहेत. सोशल मीडियावरदेखील हे पोस्टर व्हायरल झाले आहे.


पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्या गळाभेटीच्या फोटोसहित 'नफरत से नही प्यार से जितेंगे' असे शब्द लिहिण्यात आले आहे. दादर, जोगेश्वरी, सीएसटी, विक्रोळी भागात काँग्रेसने पोस्टर्स लावले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्याचं या पोस्टरमध्ये दिसत आहे.


संसदेत अविश्वास प्रस्तावादरम्यान भाजप आणि आरएसएसला उद्देशून राहुल गांधी म्हणाले होते, की तुमच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे मात्र माझ्या मनात तुमच्या बद्दल राग आणि तिरस्कार नाही. तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता मात्र त्याने मला फरक पडत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या जागेवरुन उठून मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली होती.


अमित शाह यांचा मुंबई दौरा
भाजपाध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या आज दिवसभर संघटनात्मक बैठकाही होणार आहेत. संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत ते ज्येष्ठ गायिक लता मंगेशकर यांचीही भेट घेणार आहेत.