मुंबई : फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्या नाना पाटेकर यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माहिती नाही, त्या गोष्टींबद्दल नाना पाटेकरांनी चोंबडेपणा करु नये, असा सल्ला देत राज ठाकरे यांनी नानांची मिमिक्रीही केली.


मुंबईत मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाईबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं. या आंदोलनात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या आणि ज्यांच्यावर केसेस पडल्या आहेत, त्यांचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं.

नाना पाटेकरांचा समाचार

फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्या नाना पाटेकर यांच्यार राज ठाकरेंनी निशाणा साधला. माहित नाही त्या गोष्टींमध्ये नाना पाटेकरांनी चोंबडेपणा करणं बंद करावं. पाण्याचा प्रश्न सरकारकडून सुटत नव्हता म्हणून नानांनी पुढाकार घेतलाच ना. तसंच सरकारकडून सुटत नाही त्या प्रश्नासाठी रस्त्यावर आम्ही काय करायचं, हे नानांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात राज ठाकरेंनी नानांना सुनावलं.

मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हत्या त्यावेळी नाना कुठे दिसले नाही. त्यावेळी मनसेने लढा दिला आणि मराठी सिनेमांना प्राईम टाईम शो मिळवून दिले, असं म्हणत नानांचा राज ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला.

फेरीवाल्यांवरुन मुंबईत सध्या राडा सुरु आहे. फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. सगळे मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत आहेत. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आळवल्याने, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.

''… तर गरीब कोण?''

फेरीवाले गरीब आहेत, असं सर्वांना वाटतं. फेरीवाले दररोज शंभर रुपये हफ्ता देतात. आपला नोकरी करणारा माणूस दररोज शंभर रुपये देऊ शकतो का? मग गरीब कोण आणि श्रीमंत कोण? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रात आपलंच कुंपन शेत खातंय. आपलेच मराठी अधिकारी परप्रांतीयांना पोसतात. या शहरात कोण कुठून येतं आणि कुठे राहतं याची काहीही माहिती नाही. राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागातून दररोज 48 ट्रेन येतात. भरुन येतात आणि रिकाम्या जातात. हे सगळे लोंढे कुठे राहतात याची काहीही माहिती नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवरही निशाणा साधला.

मुंबईत मराठी माणूस, गिरणी कामगार बेघर आहेत. पण परप्रांतीयांच्या झोपडपट्ट्यांना एक-एक कोटी रुपये, वरुन त्यांना घरही दिलं जातं, असंही राज ठाकरे म्हणाले.

''... तर पुन्हा हात जोडणार नाही''

रेल्वे स्टेशन दीडशे मीटर अंतरावर आणि रुग्णालय, शाळा या परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. याचं राज ठाकरेंनी अभिनंदन केलं. या निर्णयाची प्रत सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना दिली जाणरा आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत पोलीस स्टेशन, वॉर्ड अधिकारी, रेल्वे पोलीस, स्टेशन मास्तर यांना मनसे पदाधिकारी नेऊन देणार आहेत. ही नोटीस दिल्यानंतरही फेरीवाले बसले तर सर्वांवर कोर्टाचा अवमान केल्याची केस टाकणार आहे, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

फेरीवाले बसू नयेत ही जबाबदारी महापालिका, पोलिस आणि संबंधित वॉर्डची आहे. यानंतरही फेरीवाले बसले तर आता जे हात जोडतोय, ते पुन्हा जोडणार नाही, असा स्पष्ट इशारा राज ठाकरेंनी दिला.

''आपल्या मुख्यमंत्र्यांमध्ये ती हिंमत आहे का?''

कर्नाटकात रहायचं असेल तर बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाला कानडी आलीच पाहिजे, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले. तशी हिंमत आपल्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे का, अशा सवालही राज ठाकरेंनी केला.

''सुशांत माळवदे हल्ला प्रकरणावर सूचक मौन''

फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करताना मालाडमध्ये मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात माळवदे जखमी झाले. या प्रकरणावर राज ठाकरे बोलतील, अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र आपण काही मुद्द्यांवर जाणीवपूर्वक बोलणार नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

काही विषय बोलायचे नसतात, ते मनात ठेवायचे असतात, असं म्हणत राज ठाकरेंनी सूचक इशारा दिला. त्यामुळेच आतापर्यंत या प्रकरणावर काहीही बोललो नसल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर