मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आज मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा केला. या दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या गाड्यांचा ताफा खेड-भरणानाका येथे रोखण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलकांनी बांधकाम मंत्र्यांच्या गाडी भोवती घेराव घातला.
चंद्रकांत पाटील खाली उतरून आंदोलकांना सामोरे गेले. मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बांधकाम मंत्र्यांना दहा मिनिटे रस्त्यावर चालू दाखवा, असा आग्रह धराला. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणा बाजी केली. अखेर खेड पोलिसांनी आंदोलकांना दूर हटवट बांधकाम मंत्र्यांच्या ताफ्या करता मार्ग मोकळा केला.
आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. तर दुसरीकडे मंत्री महोदय पेण-सावंतवाडी रस्त्याची पाहणी करत असल्यानं चिपळूण शहरात रस्त्यावरील खड्डे बुझवून डागडुजी करण्यात आली.
चंद्रकांत पाटील मुंबई-गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग अशी पाहणी केली. रायगडमधील पेणपासून सावंतवाडीपर्यंतच्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्ग मोटरेबल म्हणजेच किमान सुखकर प्रवास व्हावा असा तयार असेल, असं कोकणवासियांना आश्वस्त केलं.
मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणं म्हणजे कठीण काम आहे. त्यातच खड्ड्यांमुळे अनेक अपघातही होत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावर रायगड ते सिंधुदुर्ग असा पाहणी दौरा आयोजित केला आहे.
संबंधित बातम्या