Uddhav Thackeray: या देशात लोकशाहीचा खून आपल्या डोळ्यांसमोर होतो आहे आणि खून करणारे त्या खुर्चीवर दिमाखात बसले आहेत. मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज तुम्ही नुसती ठिणगी बघताय, पण ही ठिणगी कधी वणवा बनेल हे कळणार नाही ते लक्षात ठेवा. या ठिणगीत तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांचा उल्लेख पुन्हा अॅनाकोंडा असा करत हल्लाबोल केला. पक्ष चोरल्यानंतर मतचोरीही करत असून यांची भूक क्षमत नाही, या अनाकोंडाला आता कोंडायलाच लागेल, नाहीतर हे सुधारणार नाहीत, अशा शब्दात फटकारले. ठाकरे म्हणाले, “आम्ही एकत्र आलो आहोत, मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी. ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे. जर मतचोरी करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला, तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही

Continues below advertisement

“माझ्या नावानेच खोटा अर्ज, हा हॅकिंगचा प्रयत्न!”

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मतदार यादीतील नावाबाबत धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले, “माझ्या नावाने, माझ्या मोबाईल नंबरशिवाय, एक खोटा अर्ज दाखल करण्यात आला. पडताळणीत स्पष्ट झालं की हा अर्ज मी केलेला नाही. तो अर्ज 23 ऑक्टोबर 2025 रोजी दाखल करण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न झाला का, हे आम्हाला आता शोधावं लागेल.”

“मुख्यमंत्र्यांनाही मान्य की मतचोरी चालू आहे”

ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की मतचोरी होत नाही. पण त्यांनी ते बोलले म्हणजे त्यांनीच मान्य केलं की मतचोरी होते आहे. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, आमचा पर्दाफाश करा! दूध का दूध, पाणी का पाणी करून दाखवा.” त्यांनी टोला लगावत म्हटलं, “निवडणूक आयुक्त तर तिकडे लाचार झालेलाच आहे. कोणाचं नाव टाकायचं, कोणाचं काढायचं, सगळी यंत्रणा यांच्या हातात आहे.”

Continues below advertisement

 “ही विरोधी पक्षांची नव्हे, लोकशाहीची एकजूट”

“संयुक्त महाराष्ट्रानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ही विरोधी पक्षांची नव्हे, तर लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या पक्षांची एकजूट आहे,” असं ठाकरे म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “आम्ही निवडणुका होऊ द्यायच्या नाही असं म्हणत नाही. आम्हाला निवडणुका हव्यात, पण त्या प्रामाणिक हव्यात. चोरी, फेरफार आणि आधीच निकाल ठरवून घेतलेल्या निवडणुका नकोत. जर असं होणार असेल, तर मग जनता ठरवेल निवडणुका होऊ द्यायच्या की नाही.”

“मतदार तपासा, तुमचं नाव काढलं नाही ना?”

उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेला आवाहन करत म्हटलं, “सर्व मतदारांनी आपापलं नाव यादीत आहे का हे तपासा. आपल्या घरात आपल्याला न दिसणारी माणसं राहत नाहीत ना हेही पाहा. जर शौचालयात 100 माणसं राहू शकतात तर तुमच्या घरात किती राहू शकतात याचा विचार करा.” ते पुढे म्हणाले, “मत चोर दिसला तर त्याला लोकशाही मार्गाने फटकवा. आम्ही न्यायालयात जाणार आहोत. सगळे पुरावे सादर करून पाहू, न्यायालयात तरी न्याय मिळतो का.”

इतर महत्वाच्या बातम्या