सभेच्या ठिकाणी निरुपम यांचं आगमन झाल्याबरोबर काही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर खुर्च्याही उचलून फेकल्या. तसेच काही मनसैनिक थेट स्टेजवरच गेले. त्यामुळे त्यांच्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
यावेळी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यापुढे निरुपम याची प्रत्येक सभा उधळणार असल्याचंही मनसे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा वाद सुरु आहे. याच वादातून मालाडमधील काही फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या फेरीवाल्यांना निरुपम यांनी भडकवल्याचा आरोप मनसेनं केला होता. याच मारहाणीच्या निषेधार्थ निरुपम यांची सभा उधळल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.