मुंबई : फेरीवाल्यांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या मनसेची सध्या मोठी कोंडी झाली आहे. फेरीवाल्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंच्या घराबाहेरच आता फेरीवाले बस्तान बसवणार आहेत. ‘कृष्णकुंज’बाहेर फेरीवाला क्षेत्र तयार केल्यानं मनसेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. याचसंदर्भात आज (बुधवार) कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.


यावेळी आपल्या क्षेत्रातील हॉकर्स झोनबाबतील हरकती नोंदवण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच यासंदर्भात मनसे पदाधिकारी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. कृष्णकुंज समोरच्या केळुस्कर आणि राऊत मार्गावरचं फेरीवाला क्षेत्र नियमातच बसत नसल्याचा दावा मनसेनं केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्यालय असलेल्या माटुंगा मधील पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० फेरीवाले बसतील. शिवाजी पार्कातील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर १० फेरीवाल्यांना बसण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे.

धक्कादायक म्हणजे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कलानगरच्या मातोश्री बंगल्याचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये टाकण्यात आला आहे. यामुळे मनसेत संतापाची लाट पसरली आहे. नव्या धोरणानुसार दादरमधील शिवसेना भवनासमोर १००, दादरमधील मुंबई भाजप कार्यालय असलेल्या फाळके रोडवर ३१० फेरीवाल्यांना बसण्यास संमती देण्यात आली आहे. पूर्वी ज्या ठिकाणी फेरीवाले नव्हते, त्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसवण्यास मनसेचा विरोध आहे.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’बाहेरच फेरीवाले बसणार?

मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्या : रामदास आठवले

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर

नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे

मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम