मुंबई : नुकतीच महाराष्ट्र सरकारने अनेक व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाही या यादित समावेश आहे. अशा परिस्थितीत 'महाराष्ट्र रक्षक' टीमने राज ठाकरे यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मनसेचे सचिव नयन कदम यांनी खासकरुन राज ठाकरे यांच्या संरक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.
सरकाराकडून सुरक्षेत कपात
राज्य सरकारने 10 जानेवारीला भाजपच्या दिग्गज नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आतापर्यंत राज ठाकरेंना देण्यात आलेली झेड (Z) सुरक्षा व्यवस्था बदलून वाय (Y) सुरक्षा करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. राज यांना सरकारी संरक्षणाची गरज नसल्याचे मनसेचे अधिकारी म्हणत आहेत. आम्ही राज ठाकरे यांचे रक्षण करण्यास सक्षम आहोत.
महारक्षक टीम काय करणार?
आता मनसेने तयार केलेली महाराष्ट्र रक्षक टीम राज ठाकरे यांचे रक्षण करील. आगामी काळात या टिमचे सदस्य राज ठाकरे यांच्याभोवती दिसतील. राज ठाकरे जिथे जिथे जातील तिथे त्यांच्यासमवेत हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक महत्त्वपूर्ण बैठका आगामी महानगरपालिका आणि सद्य ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता आयोजित केल्या आहेत. राज ठाकरेही या सभांना जातील. या ठिकाणी महारक्षक टीमचे सदस्यही हजर असतील.
या बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात
राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.