Davos Investment In Maharashtra : महाराष्ट्रात 4 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 30 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये याबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 66 हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र सरकारने व्यक्त केला आहे.
फार्मा आणि मेडिकल उपकरणे, आयटी, डाटा सेंटर्स, टेक्सटाइल्स, पेपर ॲंड पल्प, स्टील, फूड प्रोसेसिंग, पॅकेजिंगसारख्या क्षेत्रातून महाराष्ट्रात गुंतवणूक होणार आहे. यामुळे राज्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरीका आणि जपानसारख्या देशातून थेट परकीय गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
महाराष्ट्राकडून डावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे 23 सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये इंडोरामा, मायक्रोसॉफ्ट आदी कंपन्यांचा समावेश आहे. पुण्यात मायक्रोसॉफ्टच्यावतीने डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सामंजस्य कराराच्या वेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आशिष कुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात कुठे होणार गुंतवणूक?
मायक्रोसॉफ्ट कंपनी पुण्यात डेटा सेंटर सुरू करणार आहे. त्यासाठी 3200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. राज्यातील नागपूर आणि कोल्हापूर या वस्त्रोद्योग केंद्रामध्ये इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड आदी प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या गुंतवणूक करणार आहे. इंडोनेशियातील आशिया पल्प अॅण्ड पेपर (एपीपी) कंपनी रायगडमध्ये जवळपास 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी लगदा आणि कागद उत्पादन करते. इंडोनेशियातील ही आघाडीची कंपनी आहे. त्याशिवाय, हॅवमोर आईस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यात आईस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करणार आहे.