मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन साकीनाका, दूधवाला बिल्डींग येथे नालेसफाईचा केवळ दिखावा कसा केला जातोय हे व्हिडीओद्वारे समोर आणले आहे. साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत नाल्यातील गाळ नाही तर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केली असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत नालेसफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


मुंबई महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. मात्र, गाळ वाहून नेणाऱ्या डंपरमध्ये गाळा ऐवजी डेब्रिजचा भरणा होतोय. डंपरमध्ये डेब्रिज भरलं जातय आणि वरच्या थरात गाळ टाकला जात आहे. अशाप्रकारने डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांकडून केली जात आहे. गाळाचे वजन वाढविण्यासाठी कंत्राटदाराकडून हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत नाले सफाईत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला.


मुंबई महापालिकेत जे विरप्पन बसले आहेत, त्यांच्यावर करवाई करण्याची हिंमत महापौर यांनी दाखवावी. मुंबई महापालिकेतील विरप्पन गँगची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांच्या या गंभीर आरोपानंतर शिवसेना काय पाऊलं उचलते हे पाहावं लागणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणीला सुरुवात झालीय. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेकवेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा सेनेवर निशाणा साधलाय.