मुंबई : मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. परप्रांतीयांमुळे मुंबई महान झाली, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते.


“गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा कोणत्याही भाषेचा नाही.”, असा सल्लाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना दिला.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावेळी, “उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,” असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

शिवाय, सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना निशाणा करत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर मनसेच्या गोटातून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री विरुद्ध मनसे, अशी लढाई दिसली तरी आश्चर्य वाटायला नको.

संबंधित बातमी : इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात : मुख्यमंत्री