मुंबई : राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण असताना महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला दिलं जात असल्याचा आरोप मनसेने मुख्यमंत्र्यांवर केला आहे.


राज्यात दुष्काळ असतानाही 46 टीएमसी पाणी गुजरातला वळवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिली खोटी माहिती दिली असल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे.

राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी हे गुजरातच्या शेतीला दिलं  जात आहे. मोदी आणि शाह जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी दिलं आहे, असा गंभीर आरोप नितीन भोसले यांनी केला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पाणी देण्याचा असा कोणताही करार झाला नाही. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही भोसले म्हणाले.

गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत वळवावं. गुजरातला वाहून जाणार पाणी न अडवून मुख्यमंत्री मोदी शहा यांना खुश करत आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांशी अनेकदा बोलणं झालं आहे. पण आमच्याकडे पैसा नसल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. केंद्र जेव्हा पैसा देईल तेव्हा आम्ही विचार करू, असे मुख्यमंत्री म्हणाले असल्याचे भोसले म्हणाले.

दरम्यान या पाण्यासाठी नितीन भोसले 13 दुष्काळी जिल्ह्यात जात पाणी यात्रा काढणार आहेत.



काय आहे महाराष्ट्र-गुजरात पाणीवाद?
केंद्र शासनाकडून दमणगंगा-साबरमती नदी जोड प्रकल्पाद्वारे 35 दशलक्ष घनफूट पाणी हे गुजरातमधील खंबाट धरणामध्ये सोडले जाणार आहे. तसेच नार-पार नदी, अंबिका आणि आरंगा खोऱ्यातून तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाद्वारे 21 दशलक्ष घनफुट पाणी हे गुजरातमधील खच्छ, भूज आणि सौराष्ट्रमधील सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राचे हक्काचे तब्बल 1,330 दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातच्या मधुबन धरणात पोहचवून पुढे कच्छ व सौराष्ट्रातही पाठवले जाणार आहे. महाराष्ट्राचं पाणी गुजरातमध्ये 600 किलोमीटर आतपर्यंत पोहोचवले जाऊ शकते. परंतु नद्यांपासून, जल साठ्यांपासून अवघ्या 100 किलोमीटरवर असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाणी का पोहोचू शकत नाही? असा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.