मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. विनापरवानगी लोकल प्रवास केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी काल मुंबईसह शेजारील शहरांमध्ये मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केलं. यावेळी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची रेल्वे पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. तसेच त्यांना लोकल प्रवास करण्यासाठीही पोलिसांनी मज्जाव केला. काल सकाळी शेलू ते कर्ज मार्गावर प्रवास केल्याप्रकरणी कर्जत लोहमार्ग पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह गजानन काळे, संतोष धुरी, अतुल भगत या तिघांनाही अटक केली आहे.


मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकल सुरू व्हावी यासाठी मनसेने सोमवारी (21 सप्टेंबर) वेगवेगळ्या स्थानकांमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही सहकार्‍यांसह लोकलने कोणत्याही परवानगीविना प्रवास केला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. आता या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली, मात्र अजूनही लाखो प्रवासी रोज धक्के खात रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत. एकीकडे राज्य सरकारने एसटी बसेस आणि इतर बसेस सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मग लोकल का सुरु करत नाही, असा सरकारला सवाल विचारत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला लोकल सुरु करण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत रविवारी संपल्याने, सोमवारी सविनय कायदेभंग करुन लोकल प्रवास करणार असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल सकाळी संदीप देशपांडे यांच्यासह नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर दोघांनी शेळू ते नेरुळ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर या प्रवासाचे व्हिडीओदेखील प्रसारित केले आणि सरकारला परवानगीशिवाय लोकलमधून प्रवास करुन दाखवले.


या त्यांच्या बेकायदेशीर प्रवासासाठी कर्जत लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर तीन जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने कोरोना संसर्ग संदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकल्याने, रेल्वेमध्ये दरवाजात लटकून प्रवास केल्याने, बेकायदेशीररित्या विनातिकीट प्रवास केल्याने, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसीच्या कलम 188 आणि 269 नुसार, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याच्या कलम 51 ब आणि 52 नुसार, महाराष्ट्र covid योजना 2020 च्या कलम 11 सोबत, भारतीय रेल्वे अधिनियम च्या कलम 147 153 आणि 156 अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :