मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही तासांसाठी का होईना, पण शालेय जीवनाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. मुंबईतील दादरमधल्या प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरमधल्या स्वरराज ठाकरेचं आयुष्य त्यांनी पुन्हा एन्जॉय केलं. निमित्त होतं बालमोहन विद्यामंदिरच्या 1983 सालच्या दहावीच्या बॅचचं स्नेहसंमेलन.

वयाच्या 15-16 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेली मुलं-मुली आज वयाच्या पन्नाशीत पुन्हा एकत्र आली होती. शाळा सोडून 35 वर्ष झाल्यानंतर हे विद्यार्थी एकत्र जमले.



या स्नेहसंमेलनाच्या आखणीत प्रमुख भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष व्यासपीठापासून कटाक्षाने दूर राहिले. वय आणि सामाजिक प्रतिष्ठा विसरुन नाचणाऱ्या-गाणाऱ्या मित्रमैत्रिणींचं ते आसनव्यवस्थेच्या मागे उभं राहून टाळ्या वाजवत ते कौतुक करत होते.

या सोहळ्याला उपस्थित दोनशे मित्रमैत्रिणींसोबत त्यांनी कळत-नकळत सेल्फींचा विक्रमही साजरा केला. कुणी चाहत्याच्या, तर कुणी टीकाकाराच्या भूमिकेत केलेलं कौतुक आणि टीकाही त्यांनी केवळ मित्रमैत्रिणींनी दिलेला सल्ला म्हणून आनंदानं ऐकून घेतला.



राज ठाकरे यांनी मित्राच्या भूमिकेत दाखवलेली ही आपुलकी, स्नेहसंमेलनानंतर घरी परतताना त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या कायमची लक्षात राहणारी ठरली.