मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन 'भारत बंद'ला पाठिंबा देतील. मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, असं आश्वासन मनसेतर्फे देण्यात आलं आहे. मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बाहेर पडावं, असं आवाहन मनसेने केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून या प्रकाराचे आदेश दिले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 'भारत बंद'ला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने 'भारत बंद'ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला.
उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 'भारत बंद' ठेवण्याचं आवाहन काँग्रेसने केलं आहे.