मुंबई : जवळपास मागील दीड दशकांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) मुद्यांवरून पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आक्रमक होणार आहे. मात्र, हे आंदोलन  खळ्ळखट्याक पद्धतीने नव्हे तर अभिनव मार्गाने होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनामुळे तरी प्रशासन जागे होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 


पावसाळ्यात दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीपासून ते आरोग्यविषयकही तक्रारी निर्माण होतात. मात्र, खड्ड्यांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. काही दिवसांपूर्वी मनसेने रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवली होती. आता, राज ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 


राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या फोटोसह कार्यकर्त्यांना आवाहन करणारी पोस्ट केली आहे. त्यात राज ठाकरे यांनी म्हटले की,  माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेंव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल.


 






मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावर मनसे आक्रमक 


मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली आहे. या मेळाव्यात प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली. "असं आंदोलन करा की, यापुढे रस्ते करताना सरकारला अशाप्रकारे आंदोलन झालं होतं अशी भीती असावी, दहशत असावी," असं म्हणत राज ठाकरे यांनी या आंदोलनाला हिरवा कंदिल दाखवला. 


'मुंबई-गोवा हायवेवर आतापर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च'


मुंबई-गोवा या रस्त्यावर आतापर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाला आहेत. रस्ता नाही झाला बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. गडकरी यांच्याशी बोललो.. तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. यामागे काही कारण तर नाही ना.. कुणाचं काम तर नाही ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली. कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत.. कुंपण शेत खातंय… आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.