मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण देशभरात गेल्या 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूची दुकानं वगळता इतर सर्व दुकानंही बंद आहे. या सर्व परिस्थितीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे आज एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते.


येत्या 3 मे रोजी लॉकडाऊन-2 ची मुदत संपत आहे. मात्र पुन्हा लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र लॉकडाऊन वाढवून प्रश्न सुटणार आहेत का? लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढवणार? त्यामुळे कोरोना संपणार आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सरकारच्या नियोजनातही काही त्रुटी आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकानं दिवसभरात अवघी काही तास उघडी ठेवली तर लोक गर्दी करणारच. लोकांना काही मोकळीक दिली तर लोक सर्व नियम पाळून कोरोनापासून बचाव करतील आणि सर्व सुरळीत सुरु राहिल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.



लॉकडाऊन किती वेळ सुरु ठेवणार यालाही काही मर्यादा असायला हव्यात. अजून किती दिवस लॉकडाऊनमध्ये घालवणार. सर्व गोष्टी बंद ठेऊन देशाचं आणि राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अपघातांमध्ये दरवर्षी अनेक लोक मरतात, मग कुणी गाडी, रेल्वेत बसायचं बंद करतं का? कोरोनाचा परिणाम किती आहे, त्यात मृत्यूचं प्रमाण किती आहे. सरकारनेही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. कोरोना असा लगेच जाणार असं वाटत नाही. त्यामुळे योग्य खबरदारी आणि काळजी घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. कोरोना कधी संपेल यावर लॉकडाऊन अवलंबून नसावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


महाराष्ट्राच्या समोरचं सर्वात महत्वाचं जे आव्हान दिसतंय ते म्हणजे आर्थिक संकट आहे आणि हे खूप मोठं संकट आहे. याला आपण कसे सामोरे जाणार आहोत? या पार्श्वभूमीवर केंद्राने देखील राज्यांबाबत काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटीचे पैसे अजून राज्यांना मिळाले नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलं.


मद्यविक्रीला परवानगी द्या मी अशी मागणी केली. कारण राज्यात पैसा उभारण्यासाठी ते आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या आधी राज्यात दारुबंदी होती का? असा सवाल राज ठाकरे विचारला. लॉकडाऊनमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यामुळे राज्याला महसुलाची गरज आहे. नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा. मी अशी मागणी केली तर काही जणांना वाटलं की मी तळीरामांची बाजू घेतली. तुमच्याकडे तात्काळ पैसे कुठून येणार आहेत. मद्यविक्री सुरु करणे हा एकमेव मार्ग आहे. याऐवजी कारखाने उघडा सांगत आहेत, मग उघडा. मी काही दारुचे गुत्थे सुरु करा सांगितलं नाही. महाराष्ट्रात लोकांना तुम्ही परवाने दिले आहेत. हे खातं किती महत्त्वाचं आहे ते त्या खात्यांच्या मंत्र्यांना माहिती आहे. राज्याने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.


CM Uddhav Thackeray | 3 मे नंतर झोननुसार मोकळीक देणार : मुख्यमंत्री