मुंबई: दादरमधील उच्चभ्रू परिसरात खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा एबीपी माझानं पर्दाफाश केल्यानंतर आता या विरोधात मनसेनं आवाज उठवला आहे. आज मनसेने दादरमधील महापालिका कार्यालयात जाऊन आंदोलन केलं.


या आंदोलनानंतर तात्काळ महापालिका अधिकाऱ्यांनी वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या दादरमधील सत्कार हॉटेलवर कारवाईला सुरवात केली. महापालिकेने पोलिसांना पत्र पाठवून लवकरात लवकर  हॉटेल मालकावर गुन्हा नोंदवणाचे आदेश दिले आहेत.



तसेच या हॉटेलवर कारवाई करुन परवाना रद्द करणार असल्याचंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं हा गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. ‘माझा’नं या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर आता प्रशासनही खडबडून जागं झालं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?:

दादर… मुंबईतलं अतिशय महत्त्वाचं आणि मध्यभागी असलेला परिसर. पश्चिम आणि मध्य मुंबईला जोडणाऱ्या दादरमध्ये अनेक महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. मात्र याच दादरला आता वेश्या व्यवसायाचं ग्रहण लागलं आहे.

दादर… मुंबईचं सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक केंद्र. पण हेच दादर आता वेश्या  व्यवसायाचं देखील केंद्र बनत चाललं आहे. तेही पोलिस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या आशीर्वादानं.

दादरमधील उच्चभ्रू परिसरात वेश्याव्यवसाय सुरु असतो. तर ज्यांना वेश्या परवडत नाही त्यांच्यासाठी तृतीयपंथीय देखील उपलब्ध असतात. याचाच पर्दाफाश एबीपी माझाच्या टीमनं केला आहे.



आम्ही सुरुवातीला पोहोचलो दादरमधील प्रसिद्ध महाविद्यालय डी.जी.रुपारेलजवळ. बाहेरून चकचकीत दिसणारं सत्कार हॉटेल आतून मात्र कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसायाचं केंद्र बनलं आहे. बाहेर उभ्या असलेल्या वेश्यांबरोबर आमच्या प्रतिनिधीनं आधी ग्राहक बनून चर्चा केली.

नंतर आम्ही हॉटेल मध्येही घुसलो. छोट्याश्या जागेत एका माणसाला झोपता येईल एवढंच कम्पार्टमेंट, अशी दुतर्फा बनलेली व्यवस्था करण्यात आली आहे. सेवा पुरविणारा कर्मचारी वर  गेल्यानंतर अचूक मार्गदर्शन करतो.



पोलिस आणि प्रशासनाला हप्ते पुरविणाऱ्या हॉटेलला भिडण्यासाठी इथले रहिवासी देखील घाबरतात.

VIDEO: