मुंबई : ठाकरे सरकारने मुंबई मेट्रो-3 च्या संचालक अश्विनी भिडे यांना नववर्षाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएल (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) आणि मेट्रो-3 चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे.


आरे वसाहतीमधील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवत ठाकरे सरकारकडून अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.


मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे वसाहतीमधील वृक्षतोडीवरुन वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांच्यावर शिवसेनेने टीका केली होती. यावेळी आरे येथील कारशेड प्रकल्प हलवल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका भिडे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर टीकादेखील केली होती.


अश्विनी भिडे यांना हटवून सक्षम अधिकाऱ्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु ही मागणी पूर्ण झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेची राज्यात सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, तर आदित्य ठाकरेदेखील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार भिडेंची बदली करेल, असा अंदाज अनेक जण वर्तवत होते. परंतु सत्ता आल्यानंतर शिवसेनेने अश्विनी भिडे यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे.


आरे वसाहतीमध्ये मेट्रो-3 चे कारशेड उभारले जाणार आहे. परंतु पर्यावरणवादी आणि तिथल्या स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. याचदरम्यान शिवसेना स्थानिकांच्या आणि पर्यावरणवाद्यांच्या बाजूने उभी राहिली. तर अश्विनी भिडे कारशेड आरे वसाहतीमध्ये बांधण्यावर ठाम होत्या. त्यावेळी शिवसेना आणि भिंडे यांच्यात खटका उडाला होता.


कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो 3 प्रकल्पाचे काम सध्या जोमाने सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली आहे. परंतु उर्वरीत काम सुरु आहे.


मेट्रो प्रकल्पाची दिरंगाई नक्की कुणामुळे? मुंबई मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा | माझाकट्टा | ABP Majha