मुंबई: भाजप आमदार अनिल गोटे यांनी आज संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापटांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर दिलं. ‘पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन.’ अशा शब्दात अनिल गोटे यांनी या नोटीशीला उत्तर दिलं.

‘वरिष्ठ सभागृहातील सदस्य कामकाजात अडथळा आणतात. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या आशा आकांक्षांच्या मध्ये येण्याचं काम विधानपरिषद करणार असेल तर परिषदेचं अस्तित्व हवंच कशाला?’  असं म्हणत आमदार गोटेंनीच प्रतिप्रश्न केला आहे.

‘विधानपरिषदेबाबतच्या वक्तव्यावर तुम्ही ठाम आहेत का? असं मुख्यमंत्र्यांनी विचारल्यावर मी ठाम असल्याचं सांगितलं. पण आता या विषयावर बोलणार नाही. पक्षाची शिस्त पाळीन.’ असं उत्तर गोटेंनी दिलं आहे.

पक्ष नेतृत्वाला किंवा मुख्यमंत्र्यांना माझं स्पष्टीकरण मान्य नसेल तर पक्ष जी कारवाई करेल त्याचा शिस्तबद्ध सैनिक म्हणून स्वीकार करीन. पण कोणत्याही झुंडशाहीला दबणार नाही. पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन. पण पक्षफोड्या, घरफोड्या नेत्यांच्या आश्रयाला जाणार नाही. असंही आमदार गोटेंनी ठणकावून सांगितलं.

काय आहे प्रकरण:

विधानपरिषद बरखास्त करा अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटेंनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेमध्ये उमटले होते. अनिल गोटेंनी विधानसभेत बोलताना विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढण्यात आलं होतं.

यानंतर अनिल गोटे यांना संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. विधानपरिषद बरखास्त करावी अशी सरकारची किंवा पक्षाची भूमिका नसताना तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करत आहात? असा सवालही त्यांना विचारण्यात आला होतं.

दरम्यान, याबाबत बोलताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ‘गोटेंचं वक्तव्य हे सभागृहाच्या उंचीला शोभणारं नाही’. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोटेंना सुनावलं होतं.

अनिल गोटेंनी विधानपरिषद बरखास्तीची मागणी केल्यानंतर सर्व पक्षातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत निवेदन सादर केलं होतं. यावेळी त्यांनी गोटेंचं वक्तव्य सरकारला आणि वैयक्तिक आपल्यालाही आवडलं नसल्याचं सांगितलं होतं.

‘संविधानाने हे सभागृह तयार झालं आहे, कोणाच्या सांगण्यावरून ते तयार झालेलं नाही.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्यानं या सभागृहाबद्दल कुठलीही द्विधा मन:स्थिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या:
'त्या' विधानाबाबत स्पष्टीकरण द्या, आ. अनिल गोटेंना कारणे दाखवा नोटीस