मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची अवघ्या दोन महिन्यातच बदली झाली आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी बी. जी. पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी मतभेद झाल्याने तसंच स्थानिक सत्ताधारी भाजपा आमदाराला स्वतःच्या मर्जीतील आयुक्त महापालिकेत हवा असल्याने ही बदली झाल्याची चर्चा रंगली आहे.

याआधीही मिरा भाईंदरचे तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांचे भाजपाशी खटके उडाले होते. त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते.

मिरा भाईंदर महापालिकेत सहा वर्षात सहा आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. बी.जी पवार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी महापालिकेतील राजकारण आणि लोकप्रतिनीधींची दंडेलशाहीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचा राजकीय बळी घेण्यात येईल अशी चर्चा ही शहरात व्यक्त होत होती आणि अखेर खरी ठरली.

आयुक्तांच्या या अशा बदल्यामुळे शहराच्या विकास कामांवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाई यांनी मात्र स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली जर बदलीचे आदेश निघत असतील तर ही बाब निंदाजनक आहे. मर्जीतल्या अधिकाऱ्यांची आयुक्तपदावर वर्णी लावण्यात आली तर शिवसेना त्या आयुक्तांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.