मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेसाठी 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होईल, तर 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली.

आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही सहारिया यांनी केली.

मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत 27 ऑगस्ट 2017 रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणूक घेणं बंधनकारक आहे. एकूण 24 प्रभागातील 95 जागांसाठी मतदान होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 26 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत अर्ज दाखल करता येतील.

तर 3 ऑगस्ट 2017 रोजी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट 2017 पर्यंत असेल. अंतिम उमेदवारांना 7 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक चिन्हं नेमून दिले जातील.

20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर 21 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल.

मीरा भाईंदर महापालिकेवर दृष्टीक्षेप
• एकूण लोकसंख्या- 8,09,378
• मतदार (सुमारे)- 5,93,345
• एकूण प्रभाग- 24
• एकूण जागा- 95 (महिला 48)
• सर्वसाधारण- 64 (महिला 32)
• अनुसूचित जाती- 4 (महिला 2)
• अनुसूचित जमाती- 1 (महिला 1)
• नागरिकांचा मागास प्रवर्ग- 26 (महिला 13)

जि.प. आणि पं.स.च्या रिक्त पदांसाठी मतदान
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग, तसंच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

31 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. 20 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल, असंही जे. एस. सहारिया यांनी सांगितलं.