मनपा शाळेत सूर्यनमस्काराची सक्ती नको, अबू आझमींची सुप्रीम कोर्टात धाव
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 09:57 AM (IST)
मुंबई: मुंबई महापालिकेतील शाळेत योग आणि सूर्यनमस्काराच्या सक्तीविरोधात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सूर्यनमस्काराला विरोध करत, सपा कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योग आणि सूर्यनमस्कार बंधनकारक करावा, असा ठराव भाजपने मांडला होता. त्याला महापालिकेत बहुमताने मंजुरी मिळाली. भाजपनं मांडलेल्या प्रस्तावाला शिवसेनेनं पाठिंबा दिला. मात्र शाळेत सूर्यनमस्कार आणि योग सक्ती करण्याला काँग्रसने विरोध केला आहे. विद्यार्थ्यांना सक्ती न करता योग आणि सूर्यनमस्कार ऐच्छिक करावा, अशी मागणी काँग्रेस आणि मनसेनं केली आहे. तर सूर्यनमस्कार सक्तीचा करण्यास समाजवादी पक्षाने विरोध केला आहे.