मुंबई : मुंबईच्या ट्रॅफिकचा फटका सामान्य मुंबईकरांना रोज बसत असतो. मात्र आज केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना मुंबईतील ट्रॅफिकचा चांगलाच फटका बसला. बांद्रा पश्चिमेला असलेल्या बांद्रा - वरळी सी लिंकच्या बांद्रा रेक्लेमेशनजवळील एमएसआरडीसी ऑफिसपासून रंगशारदाजवळील कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पायपीट करावी लागली.
लिलावती हॉस्पिटलच्या सिग्नलवरील वाहतूक कोंडीमुळे सुरेश प्रभू बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून होते. सायंकाळी 6.30 चा कार्यक्रम 8 वाजेपर्यंत सुरू झालेला नव्हता त्यामुळे अखेरीस आपली गाडी आणि ताफा सोडून त्यांनी पायी चालत जाऊन कार्यक्रमाचं स्थळ गाठलं.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ती त्यांच्या कवितासंग्रहाचं मुंबईत ब्रेल लिपीत प्रकाशन करण्यात आलं. बांद्रा रेक्लेमेशनजवळील स्पॅस्टीक सोसायटी इथं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते हा सोहळा पार पडला.
'अटल विश्वास' या नावानं ब्रेल लिपीतील या पहिल्या कवितासंग्रहाच्या 500 पुस्तकांचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात 'हॅप्पी होम्स'च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी अटलजींच्या काही कवितांचं सादरीकरणही केलं. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.