मुंबई : मागील बारा दिवासांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. तब्बल बारा दिवसांनंतर आज सरकारला जाग आली आहे. विरोधक येण्याआधी आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समोरासमोर आले.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ आणि योग्य निर्णय घेऊ, असं आश्वासन सहकारमंत्र्यांनी यावेळी दिलं. मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
'सारथी' (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेवरून सदानंद मोरे यांना हटवण्याबाबतच्या आंदोलनकर्त्यांच्या मागणीची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आधीच्या सरकारने फसवलं म्हणून आमच्या सरकारवरील विश्वास कमी होत असेल, मात्र आम्ही आरक्षणाबाबत उपाययोजना केल्याची माहितीही सहकारमंत्र्यांनी दिली आहे.
बारा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृती खालावत असून एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरक्षणाची मागणी सरकारने लवकर मान्य करावी. आंदोलनात कोणाचंही बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला होता.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
- मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत,
- आंदोलकांवरील दंगलीचे गुन्हे मागे घेणे
- सारथी संस्थेच्या अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा
- मागास आयोगाचा अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबरला असल्याने येत्या अधिवेशनात ठराव मंजूर करुन केंद्राकडे पाठवा
या मागण्या मान्य झाल्या नाही तर 16 नोव्हेंबरपासून राज्यातून मराठा बांधव मुंबईत येऊन मंत्रालय, वर्षा आणि आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार, असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
दरम्यान, येत्या 26 नोव्हेंबरला मराठा संघटनेचा दुसरा गट मुंबईत आंदोलन करणार आहे. सकल मराठा मोर्चा या आंदोलनात सहभागी होणार नाही. मराठा समाजात फूट पाडण्याचं राजकारण मुख्यमंत्रीच करत असल्याचा आरोपही आंदोलनकांनी यावेळी केला. मात्र येत्या 16 तारखेपासून सकल मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर संयुक्त आंदोलन करणार आहे.