मुंबई : अवनी वाघिणीला ठार केल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये दावा-प्रतिदावा करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारल्याचा दावा शिवसेनेच्या सूत्रांकडून करण्यात आला होता. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत वाघिणीचा विषयच निघाला नाही, असा प्रतिदावा मुनगंटीवार यांनी केला आहे.

शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अवनी वाघिणीसंदर्भात प्रश्न विचारला होता. परंतु त्यावेळी सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. मुनगंटीवार थेट चंद्रपूरहून उशिरा बैठकीला पोहोचले. त्यामुळे माझ्यासमोर अवनी वाघिणीचा विषयच निघाला नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक T1 वाघिणीला 2 नोव्हेंबर रोजी गोळी घालून ठार मारण्यात आलं होतं. यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनविभागावर टीका होत आहे. यावरुन शिवसेनेने सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका करत आहे. मात्र आता मृत्यूबाबत जाब विचारण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे.

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनेका गांधी, राज ठाकरे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला होता.

मृत्यूच्या चौकशीसाठी समिती
टी वन वाघीण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. ही समिती वाघिणीच्या मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसंच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबली गेली वा नाही याबाबत वस्तुस्थितीदर्शक चौकशी करुन शासनाला अहवाल सादर करणार आहे.

संबंधित बातम्या

अवनी वाघिणीची पिल्लंही नरभक्षक बनू शकतात : शूटर शाफत अली

अवनीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप

टी 1 वाघिणीच्या बछड्यांना वाघासह वन्य प्राण्यांचा धोका