धर्मा पाटील मृत्यू: रावल, बावनकुळेंवर गुन्हा नोंदवा: नवाब मलिक
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2018 02:27 PM (IST)
ज्याठिकाणी प्रकल्प होणार आहे, अशा जमिनी हेरायच्या आणि शेतकऱ्यांकडून त्या कवडीमोल दरानं घ्यायच्या,रावल यांचा हाच धंदा असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
मुंबई: पर्यटनमंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या सांगण्यावरुनच धर्मा पाटील यांच्या जमिनीबाबतची मिटिंग रद्द झाली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. ज्याठिकाणी प्रकल्प होणार आहे, अशा जमिनी हेरायच्या आणि शेतकऱ्यांकडून त्या कवडीमोल दरानं घ्यायच्या,रावल यांचा हाच धंदा असल्याचा आरोप मलिक यांनी केला. विखरण गावात ज्या जमिनी संपादन प्रकरणात 84 वर्षाच्या धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्या भागात जयकुमार रावळ यांनीही जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे रावल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजीनामा घेऊन, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मलिक यांनी केली. मलिक काय म्हणाले? जयकुमार रावल आणि कंपनीचा धुळे जिख्यात जमीन खरेदी आणि विक्रीचा धंदा आहे. एखादा प्रकल्प जाहीर झाला की शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. रावल कुटुंबीयाने राजपूत नावाच्या शेतकऱ्याकडून सुमारे चार एकर जमीन विकत घेतली. शिवाय धर्मा पाटील यांची मंत्रालयातली जमीन मिटिंग जयकुमार रावल यांनीच ऊर्जामंत्री बावनकुळे यांना सांगून रद्द केली होती. त्यामुळे निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. प्रकल्प ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणची जमीन खरेदी करून वाढीव मोबदला सरकारकडून घेण्याचा प्रकार रावल करतात, असं आरोप नवाब मलिक यांनी केला.