मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र पोटदुखीमुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होत असल्याचे ट्विट स्वतः मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. काही महिन्यापूर्वीच ते कोरोना संसर्गातून ठीक झाले होते.
काय आहे मुंडे यांचे ट्वीट?
"तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल", असे ट्वीट मुंडे यांनी केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश होता. धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले होते.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कोरोनामुक्त
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 2 नोव्हेंबर रोजी कोरोनामुक्त झाले. त्यानंतर आज ते मंत्रालयात दाखल झाले असून कामकाज करताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं. यात अजित पवार काही फाईलींवर सह्या करताना दिसले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्या खुर्चीपासून बरंच अंतर ठेवलं असल्याचं लाईव्हमध्ये दिसत आहे. या लाईव्हमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, दत्तात्रय भरणे गप्पा मारताना दिसत आहेत.