मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाला जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी भारतीय रेल्वेने उद्या दिवसभर सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. यासोबत मुंबईच्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. लोकल गाड्या बंद केल्या नसल्या तरी त्यांची सेवा अत्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार वेळापत्रकापेक्षा कमी गाड्या चालवण्याचे ठरवले आहे.


मध्य रेल्वेवर दररोज 1774 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातात. तेच रविवार वेळापत्रकात 1425 लोकलच्या फेऱ्या चालविल जातात. मात्र, रविवारी म्हणजेच 22 तारखेला केवळ अकराशे लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातील. याचा अर्थ तब्बल 674 फेऱ्या या मध्य रेल्वेने रद्द केले आहेत. यामध्ये 337 अप मार्गावरील तर 337 डाऊन मार्गावरील यांचा समावेश आहे.

Coronavirus | जनता कर्फ्यू : 22 मार्चला 3500 हून अधिक लोकलपासून एक्सप्रेसपर्यंत विविध रेल्वे गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेवर प्रत्येक रविवारी 1278 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातात. मात्र, उद्या या लोकलच्या फेऱ्या कमी करून केवळ 801 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेने 233 ऑफ मार्गावरील फेऱ्या तर 244 डाऊन मार्गावरील फेऱ्या रद्द केल्या आहेत. इतकेच नाही तर मध्य रेल्वेने त्यांच्या सर्व डेमू आणि मेमु गाड्यांच्या सेवा रद्द केल्या आहेत. यामध्ये दिवा वसई आणि दिवा पेन या गाड्यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेने ठरल्यानुसार 21 तारखेच्या मध्यरात्रीपासून 22 तारखेच्या रात्री दहा वाजेपर्यंत सर्व पॅसेंजर ट्रेन या रद्द राहतील. तर 22 तारखेच्या सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व मेल एक्सप्रेस आणि इंटरसिटी ट्रेन या रद्द राहतील.

उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध येणार आहे. लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. उद्यापासून 31 मार्चपर्यंत लोकलवर निर्बंध घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.

What is Janta Curfew | WEB Exclusive | जनता कर्फ्यूचा उद्देश काय? काय करायचं या दिवशी?