कल्याण : या देशाला एकच रंग देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही सेक्युलर भारताला कधीच हिंदुराष्ट्र होऊ देणार नाही, असं म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कल्याणमध्ये सरकारला आव्हान दिलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी ओवेसी आज कल्याणमध्ये आले होते.
भारताच्या तिरंग्यात हिरवा रंग असला, तरी सत्ताधाऱ्यांना मात्र हिरव्या रंगाचा तिरस्कार आहे. त्यामुळे आरएसएसच्या अजेंड्यानुसार भारताला हिंदुराष्ट्र करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत हा प्रयत्न आपण कधीही यशस्वी होऊ देणार नाही, अशा शब्दात ओवेसींनी सरकारला आव्हान दिलं. तसेच महाराष्ट्रात आज मुस्लिम समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिला असून जसं मराठ्यांना आरक्षण दिलं, तसेच मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुनही त्यांनी सरकारवर टीका केली. तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांचं नुकसान होणार आहे. तिहेरी तलाक दिल्याने एखाद्या महिलेच्या पतीला अटक झाली आणि तीन वर्षांची शिक्षा झाली, तरी तो सुटून आल्यावर घटस्फोट मात्र कायमच राहील. त्यामुळे हा निर्णय व्यावहारिक नसल्याचं ओवेसी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनाही ओवेसींनी आपल्या भाषणात चिमटे काढले. आपण मेल्यानंतर औरंगाबादला आपल्याला दफन करावं अशी इच्छा आपण काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी त्यावर टीका केली, मात्र भारतात माझ्या वडिलांचा जन्म झाला, त्यामुळे ही जमीन माझ्या बापाची असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर कल्याणच्या पत्री पूल आणि खड्डे, त्यामुळे गेलेले बळी अशा स्थानिक मुद्द्यांवरुनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. मोदींना चंद्रावरचे खड्डे बघण्यात रस आहे, मात्र इथे पृथ्वीवर किती खड्डे आहेत, त्यामुळे किती बळी जातायत, हे कोण पाहणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.