मुंबई : मुंबई आतंरराष्ट्रीय टर्मिनस-2 येथील टॅक्सी काऊंटरवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रायोगिक विशेष काऊंटरवर महिनाभर काम करुन अभिप्राय देण्याचे निर्देश हायकोर्टानं 'प्रियदर्शनी' महिला टॅक्सी चालक संघटनेला दिलेत. एमआयएएलच्या प्रस्तावानुसार आता पुरूष आणि महिला टॅक्सीचालकांना एकाच ठिकाणी स्वतंत्रपणे काम करावं लागणार आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी- 2 च्या टॅक्सी बुकिंग काऊंटरवर 'प्रियदर्शनी' महिला टॅक्सीचालक संघटनेला स्वतंत्र काऊंटर देण्याची मागणी करणारी याचिका संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
एमआयएएलच्यावतीने संघटनेला काही दिवसांपूर्वी स्वतंत्र काऊंटरऐवजी सर्वसाधारण टॅक्सी स्टँडवर काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र यामुळे महिला टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. तसेच तिथे पुरूष कर्मचाऱ्यांकडून त्यांचा छळ होऊ शकतो, असा दावा संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.
मात्र जरी सर्व काऊंटर एकत्रित असले तरी स्त्री आणि पुरुष टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र दालनं तयार केलेली आहेत. कोणालाही विशेष दालन देण्यात आलेले नाही, असे एमआयएएलच्यावतीने कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. प्रत्येक चालकाला योग्य आणि पारदर्शी पद्धतीनं कामाची संधी मिळावी, यासाठी हा प्रस्ताव तयार केला गेला आहे.
महिला चालक असलेल्या अन्य कंपन्यांही आहेत, त्यामुळे याचिकाकर्त्यांना विशेष दालन मिळणार नाही. त्यामुळे यापुढे सर्व महिला आणि पुरुष टॅक्सी चालक कंपन्यांची नोंदणी एकाच ठिकाणी मात्र स्वतंत्र पद्धतीने सुरु राहील, असेही यावेळी कोर्टाला सांगण्यात आले. तेव्हा या ठिकाणी काम करुन पाहा आणि त्याबाबत महिन्याभरानंतर अभिप्राय द्या, असे निर्देश याचिकाकर्त्यांना देत हायकोर्टानं 27 एप्रिलपर्यंत ही सुनावणी तहकूब केली.