मुंबई : स्वप्ननगरी मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आणखी एक संधी मिळणार आहे. म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता, नव्या मुदतवाढीनुसार 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. त्यामुळे, कमी किंमतीत मुंबईतील घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 11 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार 6 जानेवारी, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. 7 जानेवारी, 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक 7 जानेवारी, 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी 20 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दिनांक 22 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता सोडतीत सहभाग घेणार्या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
31 जानेवारी रोजी सोडत
31 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 594 सदनिका, 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 825 सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या 728 सदनिका, रोहा-रायगड व ओरस सिंधुदुर्ग येथे 117 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
1 घरासाठी येतात 40 अर्ज
दरम्यान, म्हाडाच्या मुंबईतील एका घरासाठी 40 अर्ज येतात. काही महिन्यांपूर्वी म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी 1लाख 29 हजार अर्ज आले होते. यापूर्वी 2023 मध्ये 4082 घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 9 हजार अर्ज आले होते. अर्जदारांच्या तुलनेत घरांची संख्या कमी असल्यानं त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळं येत्या पाच वर्षात अडीच लाख घरांची निर्मिती झाल्यास लाखो मुंबईकरांना हक्काचं घर मिळू शकते.