MHADA Lottery 2023 Mumbai : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (MHADA)  जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 100935 नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत, त्यापैकी 73151 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.  


22 मे, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली होती. उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांकरीता 24,724 अर्ज प्राप्त झाले आहेत, अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांकरीता 51,198 अर्ज प्राप्त झाले आहेत. मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांकरीता 7,286 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2,074 अर्जदारांनी अर्ज केला आहे. तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत 1947 सदनिकांसाठी 15,653 अर्ज प्राप्त झाले आहेत. 


मुंबई मंडळातर्फे राज्यातील नागरिकांना सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेता यावा याकरिता नुकतेच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अर्जं नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरण्याकरिता 10 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अर्जदार 10 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील तर रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. तसेच 12 जुलै, 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 17 जुलै, 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 जुलै, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 24 जुलै, 2023 रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे


मुंबई मंडळातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सदनिका विक्रीकरिता मंडळाकडे निश्चित साचेबद्ध कार्यप्रणाली कार्यरत आहे. मंडळाने सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतींनिधी/ सल्लागार/ प्रॉपर्टी एजंट/ मध्यस्थ/ दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही. नागरिकांना असेही आवाहन करण्यात येत आहे की त्यांची अशाप्रकारे कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभनं देऊन फसवणूक करीत असल्याचें आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे. अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी 022-69468100 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदासी नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.