MHADA Lottery 2021 : दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबियांचं गृह स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे या सोडतीची चूरसही वाढली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. 


म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8984 घरांसाठी गुरुवारी ऑनलाइन सोडत निघणार असून दोन लाख 46 हजार अर्ज आले आहेत. सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ झाला असून यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 


ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात आली. http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं. तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार 100 जणांना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. सकाळी 10 वाजल्यापासून सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 


दरम्यान, कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत 8 हजार 984 सदनिकांच्या विक्री करिता ऑनलाईन सोडत होणार आहे. त्यासाठीच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते 'गो-लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला होता. 


कोकण मंडळाच्या सन 2021 च्या सोडतीतील  इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या 12 महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात आलं आहे. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25 हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25,001 हजार रुपये ते 50 हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,001 रुपये ते 75 हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.