मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या 21 इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 10 इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती  विनोद घोसाळकर यांनी आज दिलीय. 


मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. दरवर्षी या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार मे महिन्या अखेरपर्यंत 9 हजार 48 उपकरप्राप्त इमारतींचे (68 टक्के) सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 21 इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू/रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षमकरण्यात आली आहे.


मंडळाच्या चारही झोनमध्ये ठेकेदार नियुक्त करण्यात आले असून इमारतीच्या धोक्याची लक्षणे तथा इमारत कोसळल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारामार्फत तात्काळ आपत्ती निवारणाबाबत कार्यवाही केली जाणार आहे. तसेच नियंत्रण कक्षातील अधिकारी तात्काळ जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 


मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या २१ इमारतींची यादी पुढीलप्रमाणे



  1. इमारत क्रमांक 144, एमजीरोड,अ- 1163 (मागील वर्षीच्या यादीतील)     

  2. इमारत क्रमांक 133 बी बाबुलाल टॅंक रोड, बेगमोहम्मद चाल  

  3. इमारत क्रमांक 54 उमरखाडी, 1ली गल्ली छत्री हाऊस 

  4. इमारत क्रमांक 101-111, बारा इमारत रोड, (मागील वर्षीच्या यादीतील)  

  5. इमारत क्रमांक 74 निजाम स्ट्रीट,  (मागीलvवर्षीच्या यादीतील)  

  6. इमारत क्रमांक 123, किका स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)  

  7. इमारत क्रमांक 166 डी मुंबादेवी रोड (मागील वर्षीच्या यादीतील)   

  8. इमारत क्रमांक 2-4 ए, 2री भोईवाडा लेन ,  

  9. इमारत क्रमांक 42 मस्जिद स्ट्रीट   

  10. इमारत क्रमांक 14 भंडारी स्ट्रीट (मागीलवर्षीच्या यादीतील)   

  11. इमारत क्रमांक 64-64 ए भंडारीस्ट्रीट, मुंबई   

  12. इमारत क्रमांक 1-3-5 संत सेना महाराज मार्ग   

  13. इमारत क्रमांक 3 सोनापूर 2 री क्रॉस लेन   

  14. इमारत क्रमांक 2-4 सोराबजी संतुक लेन  ,    

  15. इमारत क्रमांक 387-391,बदाम वाडी व्ही पी रोड  (मागीलवर्षीच्या यादीतील)  

  16. इमारत क्रमांक 391 डी बदाम वाडी,व्ही पी रोड  (मागीलवर्षीच्या यादीतील)   

  17. इमारत क्रमांक 273-281 फॉकलँड रोड , डी, 2299- 2301 (मागील वर्षीच्या यादीतील)   

  18. इमारत क्रमांक 1, खेतवाडी 12 वी गल्ली (डी) 2049 (मागील वर्षीच्या यादीतील)  

  19. इमारत क्रमांक 31 सी व 33 ए रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी  

  20. इमारत क्रमांक 104-106 मेघजी बिल्डिंग अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग  

  21. इमारत क्रमांक 15-19 के. के. मार्ग व 1-3 पायस स्ट्रीट


या अतिधोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे एकूण 717 रहिवासी/ भाडेकरू आहेत. यापैकी 193 निवासी भाडेकरू/रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 20 निवासी भाडेकरू/रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित 247 निवासी भाडेकरू/रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाहीसुरू आहे. सदर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी/भाडेकरू यांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या सूचना देण्याची व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.


अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू/रहिवाशांना मंडळातर्फे आवाहन केले आहे की त्यांनी मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास तात्काळ  नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे.