अंबरनाथ : मेट्रोचे अधिकारी आरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आज जनआशीर्वाद यात्रेसाठी अंबरनाथमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.


सध्या नाणार प्रकल्प आणि मेट्रोतील वृक्षतोडीवरुन शिवसेना भाजपात मतभेद सुरु आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे परस्परविरोधी वक्तव्य करत असल्याने युतीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना दोन पक्षात मतभेद असल्याची कबुली आदित्य ठाकरेंनी दिली. तसंच नाणारबाबत स्थानिकांच्या भूमिकेला आमचं समर्थन असेल, असं स्पष्ट करतानाच आरेबाबत मात्र मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन खोटं बोलायला लावतात, असा आरोप आदित्य यांनी केला.


मेट्रो 3 प्रकल्पासाठीही 3 हजार झाडं तोडली होती, ती नव्याने लावली. पण आरेमध्ये फक्त झाडंच नव्हे, तर बिबट्या, अजगर आणि इतर अनेक दुर्मिळ प्राणीसंपदा आहे. त्यांचं यामुळे मोठं नुकसान होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.


दुसरीकडे वरळीतून विधानसभा निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय मी नव्हे, तर जनता घेईल, असं म्हणत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले, मात्र कुठून लढायचं हे निश्चित नसून संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असल्याचं तर म्हणाले. तर पक्षातल्या निष्क्रिय आमदारांना डच्चू देण्याबाबतच्या वृत्ताला मात्र त्यांनी हसतखेळत उत्तर देत वेळ मारुन नेली.


संबंधित बातम्या


मेट्रो कारशेड वादात अमिताभ बच्चन यांची उडी, मनसेची तिखट प्रतिक्रिया


आरेतील कारशेडसाठी वृक्षतोड 30 सप्टेंबरपर्यंत होणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही