मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणार असलेल्या मेट्रो 3 चं आगमन लांबणीवर पडलं आहे. मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पेोरेशनने राज्य सरकारला दिली.
डिसेंबर 2020 ऐवजी आता जून 2021 मध्ये मेट्रो 3 काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे साहजिक खर्चही वाढणार आहे. दरदिवशी सव्वाचार कोटी या हिशोबाने मेट्रो 3 च्या खर्चात तब्बल 765 कोटींनी वाढ होणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारला एमएमआरसीने लेखी स्वरुपात ही माहिती दिली आहे. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, गेल्या वर्षी हायकोर्टाने वृक्षतोडीवर आणलेली तीन महिन्यांची स्थगिती, रात्रीच्या वेळेत काम करण्यावर कोर्टाने आणलेली स्थगिती यासारख्या कारणांमुळे हा विलंब झाल्याचं म्हटलं जातं.
मेट्रो 3 सुरु झाल्यावर दक्षिण मुंबईतील कार्यालयात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा वेळ, कष्ट वाचणार आहेत. वाहनांची संख्या घटून ट्राफिकवरील ताण कमी होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. परिणामी इंधनबचत होण्याचाही अनुमान लावला जात आहे.