MERC ची समिती मुंबईतील वीज दरवाढीची चौकशी करणार
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2018 05:55 PM (IST)
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विसदस्यीय समिती नेमून मुंबईतील वाढत्या दरवाढीबाबत चौकशी करणार आहे
मुंबई : मुंबईतील वीज दरवाढीबाबत चौकशी करण्याचं आश्वासन महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) दिलं आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विसदस्यीय समिती नेमणार आहे. मुंबई उपनगरातील वाढीव वीजदर आणि मीटर रिडींगनुसार बिलं न आकारण्यात आल्याच्या वीज ग्राहकांच्या तक्रारींची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत तक्रारींच्या अनुषंगाने 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश एमईआरसीने 4 डिसेंबरला अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडला दिले होते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विसदस्यीय समिती नेमणार आहे. सनदी अधिकारी अजित कुमार जैन आणि एमईआरसीचे माजी सदस्य विजय सोनवणे यांची समिती येत्या दोन-तीन महिन्यात यासंदर्भात चौकशी करणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसीटी कंपनी वीज पुरवठा करत असलेल्या क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर 2018 पासून वीज दरात सुधारणा केली आहे. त्यानुसार सरासरी 0.24 टक्के इतकी वीज दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने नियमित दरापेक्षा खूप जास्त रकमेची वीज देयके ग्राहकांना पाठवल्याबाबत वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) या वृत्तांची गंभीर दखल घेतली आहे. मीटर नोंदीनुसार देयके पाठवण्याऐवजी सरासरी देयके पाठवल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आल्या असून त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे. राष्ट्रवादीचं पाच मिनिटं आंदोलन मुंबईतील वीज दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाबाहेर मोजून पाच मिनिटंच आंदोलन केलं. एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांना निवेदन दिल्यानंतर कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेंड सेंटरबाहेर पाच मिनिटं निदर्शनं, घोषणाबाजी केली आणि आंदोलन संपलं.