मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, पश्चिम आणि ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे आज कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.


रेल्वे रुळांची दुरुस्ती, विविध तांत्रिक कामं यासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.40 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकमुळे मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डॉऊन स्लो मार्गावरील लोकलसेवा डाऊन फास्ट मार्गावरुन वळवण्यात आली आहे. मेगाब्लॉकच्या काळात डाऊन स्लो मार्गावरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या मार्गावर थांबणार नाहीत. या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरील या लोकल 10 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

पश्‍चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावर आज सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाउन स्लो मार्गावरील वाहतूक बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान जलद मार्गावरुन वळवण्यात आली आहे.

हार्बर

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसटी ते चुन्नाभट्टी/माहिम या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 या वेळेत तर डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत सीएसटी ते अंधेरी, वांद्रे दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते कुर्ला स्थानकादरम्यान फलाट क्र. 8 वरून विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.