मुंबई : रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते माहीम स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक लोकल उशीराने धावतील.


मध्य रेल्वे


मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. आजच्या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सुमारे 20 मिनिट उशीराने धावतील. मेगाब्लॉक दरम्यान मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान सर्व धीम्या लोकल अप जलद मार्गावर धावतील.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम या अप-डाऊन जलद मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल अप-डाऊ धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यादरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.


हार्बर रेल्वे


हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे. तसेच पनवेल-अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-पनवेल-ठाणे आणि नेरूळ-खारकोपर लोकलची सेवा देखील बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी-वाशी आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे-नेरूळ या मार्गावरुन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.