मुंबई : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाईल.

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड-माटुंगा दरम्यान अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर, तसंच पश्चिम रेल्वेमार्गावर भाईंदर-वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो रेल्वेमार्गांवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर सकाळी 10.37 वाजल्यापासून ते दुपारी 03.22 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व अप फास्ट लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर धावतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 20 मिनिटं उशिरानं धावेल.

https://twitter.com/Central_Railway/status/934277177398345728

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या काळात पनवेल-सीएसएमटी, पनवेल-अंधेरी हार्बर वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या काळात सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील. हार्बरच्या प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेच्या मुख्यलाईनवर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते  वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी 11.00 वाजल्यापासून दुपारी 03.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात अप आणि डाऊन मार्गावरील सर्व स्लो लोकल फास्ट मार्गावरुन धावतील. मेगाब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/WesternRly/status/934307631782440960