मुंबई : रविवारच्या दिवशी मुंबई रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणं हे आता नित्याचंच झालं आहे. आजही मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर आज कल्याण ते ठाणेदरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-वाशी आणि बेलापूर-खारकोपर स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.


मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे यादरम्यान सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.54 ते दुपारी 3.52 पर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान कल्याणहून सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरुन चालविण्यात येतील. ठाणे-कल्याणदरम्यान सर्व गाड्या सर्व लोकलवर थांबतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम या स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड येथे लोकलला थांबा नसेल.

हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.30 ते 4.01 दरम्यान पनवेल-वाशी दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असेल. तसेच 11.30 ते 4.00 दरम्यान बेलापूर/सीवूड-खारकोपर मार्गावरदेखील ब्लॉक घेण्यात आला असल्याने या स्थानकांदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असेल. तसेच यादरम्यान पनवेल-अंधेरी लोकलसेवादेखील बंद असेल. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.